शिरुर – शिरुर हवेली मतदार संघातून महाआघाडीचा उमेदवार कोण याचे उत्तर येत्या काही दिवसात मतदार संघाला मिळणार असून ही ब्रेकींग बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच देणार आहेत. शिरुर व हवेलीतील राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच भेटून आले असून त्यांनी स्वत: अजितदादांनाच उमेदवारीची गळ घातली आहे. अर्थात अगदी मनातलं बोललात म्हणत दादांनी आपल्या उमेदवारीला तत्वत: होकार देवून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना बारामतीतून उभे करण्याचाही मनोदय व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडी बंद खोलीत झाल्या असल्या तरी शिरुरचा पक्का खबरीने ही माहिती आपल्या हुशारीने मिळवून शिरुर हवेलीसाठी आज जाहीर केली.
शिरुर हवेली तालुक्यातील तमाम मतदारांसाठी एक खुषखबर. राज्यातील एक तगडा नेता शिरुर हवेली मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या मनस्थितीत असून लवकरच ही घोषणा ते करतील. यासाठी शिरुर तालुक्यातील काही प्रमुख नेते पुढा-यांनी खास भेट घेवून त्यांच्या उमेदवारीची मागणी केली असून त्यांनी तत्वत: मान्यताही दिल्याची माहिती आहे. अर्थात हा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच असणार असून त्यांच्या मुलासाठी म्हणजेच पार्थला ते बारामतीतून आमदार करण्याच्या तयारीत असल्याचेही विश्वासनिय सूत्रांनी सांगितले. याबाबत शिरुर मधील १० पदाधिका-यांचे व दोन महिला पदाधिका-यांचे एक शिष्ठमंडळ अजितदादा पवार यांना मुंबईत भेटून आले. यावेळी शिरुर हवेलीतील महाआघाडीच्या उमेदवारीबद्दल खुलाशाने चर्चा झाली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार अॅड.अशोक पवार हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने शिरुर-हवेलीतून आता महाआघाडीची उमेदवारी कुणाला याबद्द्ल तर्कवितर्क लढविले जात आहे. अशातच अजित पवार यांच्या उमेदवारीने शिरुर हवेली मतदार संघ मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. यावरच शिरुर हवेली मतदार संघावर लक्ष ठेवून असलेला पक्का खबरी ने काही वरील बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांकडून माहिती एकत्रित करुन शिरुर हवेलीतील सर्व मतदारांसाठी वरील खबर जाहीर केली आहे.
मतदारसंघ भाजपला नाही राष्ट्रवादीलाच
शिरुर – हवेली मतदार संघ हा महायुतीतील कुणासाठी राखिव ठेवला जाणार याबद्दल उलट सुलट बोलले जात असले तरी एकुणच राज्याचे आणि पुणे जिल्हाचे राजकारण पाहता शिरुर हवेली हा राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचे कारण असे की, या मतदार संघाची चाचपणी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीकडूनच सुरू आहे. भाजपाचे सर्वात प्रबळ इच्छुक असलेले प्रदीप कंद हे आपल्या निवडणूकपूर्व प्रचारासाठी कुठेही सक्रीय दिसत नसून त्यांना खुद्द अजित पवारांनीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका मासिक बैठकीवेळी यावेळी थांबण्याचे सांगितल्या पासून कंदांनी आपला प्रचार आवरता आणि आटोपता घेतल्याची विश्वासनिय चर्चा आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीत बारामतीतून सुनेत्रा पवारांना बसलेल्या फटक्यामुळे अजित पवारही बारामतीतून उभे राहणार नसल्याने तिथे पार्थला संधी देवून स्वत: मात्र शिरुर हवेलीतून उभे राहून पुणे जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी ते सरसावलेले आहेत.