व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल
वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या पावत्या दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार अशोक पवारांच्या आडून जो जाहीर प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर त्यांना शासनाच्या चौकशी समितीने कधीच दिले आहे. आता ढमढेरे यांनीच पुढे यावे आणि व्यंकटेश कृपा शुगर मिल्स कारखान्याचे सन २००९ मध्ये १६ हजार शेतक-यांना दिलेले शेअर्स कधी देणार ते जाहीर करावे. पुजा भुजबळांनीही आता जरा शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीला ज्यांनी विरोध केला त्या आमदार पवारांसोबत कसे हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान वाबळेवाडी शाळेचे मार्गदर्शक सतीश वाबळे व महिलांच्या सदस्या भारती वाबळे यांनी दिले.
वाबळेवाडी शाळेत पालकांकडून पैसे घेतले जात होते का हे जाहीर करण्याचे जाहीर आव्हान विश्वास ढमढेरे व पूजा भुजबळ यांनी दिल्याची बातमी आज (दि.१६, शनिवार) माध्यमांमध्ये प्रसिध्द झाली आहे. याचाच खुलासा व प्रतीआव्हान देत वाबळेवाडी येथील ग्रामस्थ, महिला व पालकांनी एकत्र येत आपली बाजु मांडताना सांगितले की, एकट्या दिलीप वाबळेला बाजुला घेवून त्याला बोलायला लावताना त्याची मानसिक स्थिती तपासा, त्याला मिल्ट्रीतून घरी का पाठविले त्याची माहिती घ्या आणि तुमच्या हाताला दारुडेच कसे लागतात तेही सांगा. यात्रा-तमाशे बंद केले, जमिनी दिल्या आणि आम्ही शाळा उभी करुन १६ खाजगी शिक्षक नेमून त्यांचा खर्च पालकांच्या संमतीने त्यांच्याच खर्चाने केल्याचा हिशोब जगजाहीर केला. हा संपूर्ण पैसा लोकसहभागातून आणि वस्तीतील लोकांच्या नावाने करण्याचा शासन आदेश आम्ही पाळला.
शाळेच्या तक्रारी याव्यात म्हणून एकही पालक उभा राहिला नाही म्हणून अमित राऊत या कंत्राटदाराला तक्रारदार म्हणून शाळेत पाठवून शाळा बदनाम केल्याचे ढमढेरे-भुजबळ यांना माहिती नाही का? क्लिनचिटचा अर्थच ढमढेरे-भुजबळांना कळत नसेल तर या दोन्ही पदाधिका-यांनी तात्काळ त्यांच्या पदाचे राजिनामे द्यावेत. सीएसआरची कामे ही थेट होतात, त्यांचे पैसे शाळेत येत नाहीत हेही कळत नाही म्हणजे यांना काय म्हणावे ? सध्या प्रचारार्थ फिरणा-या पालकांची मुले एकटी घरी ठेवून ते कसे फिरणार म्हणून तब्बल १०० कुटुंबे मुलाबाळांसमवेत पवारांच्या विरोधात प्रचारार्थ फिरतात. आता ही मुले काय तुम्ही संभाळणार आहात का ते सांगा आम्ही तिथे मुले पाठवितो.
कोयाळी शाळेचे काय सांगता, तिथे पालकांच्या तक्रारी असताना चौकशी का नाही ते सांगा. आम्ही आमचा वाबळेवाडी पॅटर्न जगात सिध्द केला आणि शासनाने अर्थसंकल्पात आमचा आदर्श राज्याला सांगितला. तुम्ही मात्र शिक्षक संघटना मागे उभ्या राहिल्या म्हणून आम्हाला विचारताना आता २३ तारखेचा निकालच पहा, या सर्व शिक्षक संघटना तालुक्यातील अनेक शाळांच्या बाबतीत झालेल्या प्रकाराचा बदला कसा घेतात तेच तुम्हाला कळेल. शेवटी आम्ही एकच सांगतो की, तुम्ही दोघेही केवळ पोपट आहात. खरा सूत्रधार हे आमदार पवार असून त्यांनी समोरासमोर येवून वाबळेवाडी या विषयावर बोलायला यावे आणि १६ हजार शेतक-यांचे व्यंकटेशचे शेअर्स कधी देणार ते जाहीर करावे. याच १६ हजार शेअर्सपैकी एक काही शेअर्सचे फोटोही आम्ही जाहीर करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.