महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

Punediamondnews

टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध अपंग) यास अनुदान मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्षा जाई खामकर २६ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जय खामकर यांनी सांगितले की, हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांगांसाठी उच्च शिक्षण देणारे निवासी महाविद्यालय आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे २०१९ पासून सुरू असलेल्या या महाविद्यालयात सद्य स्थितीला राज्यातील ३५ दिव्यांग विद्यार्थी व २० दिव्यांग विद्यार्थिनी असे एकूण ५५ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय आर्थिक दृष्ट्या दुर्बल ७६ सर्वसाधारण विद्यार्थीही येथे शिक्षण घेत आहेत. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधांवर शासनाचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने अनेक दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.

महाविद्यालयास अनुदान मिळावे यासाठी २०२१ पासून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती.  ३० ऑगस्ट २०२३ मध्ये शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुदान मंजूर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्यापही उच्च शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे खामकर यांनी स्पष्ट केले.

खामकर यांनी इशारा दिला की, अनुदान मंजूर न झाल्यास २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार आहेत, आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी शिक्षण विभागाच्या सचिव कार्यालयावर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
www.punediamondnews.com