पाबळमध्ये जनसागराचा महापूर; अजित पवारांच्या अस्थी दर्शनाने वातावरण हेलावले माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांना फुटला पाझर; प्रफुल्ल शिवले अन् वंदना पवारांच्या विजयाचे भावनिक आवाहन –
पाबळ (प्रतिनिधी):जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पाबळ जिल्हा परिषद गटात आज एक अत्यंत भावूक प्रसंग पाहायला मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे पाबळ येथे दर्शनासाठी आगमन झाले असता, हजारोच्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या अस्थी दर्शन सोहळ्यानंतर आयोजित शोक सभेत उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले, ज्यामुळे संपूर्ण पाबळ परिसर शोकाकुल झाला होता.
हजारोचा जनसमुदाय आणि भावूक वातावरण
अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी पाबळसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अस्थी कलशाचे दर्शन घेताना अनेक आबालवृद्धांचे डोळे पाणावले होते. यानंतर झालेल्या शोक सभेत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्यांना भावना अनावर झाल्या. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना व्यासपीठावरच रडू कोसळले. हे दृश्य पाहून सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत.विकासाच्या शिलेदारांना निवडून देण्याचे आवाहन करत यावेळी बोलताना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाबळ गटात केलेल्या कामांचा पाढा वाचला. “या भागाचा सर्वांगीण विकास, रस्त्यांचे जाळे, पाणी प्रश्न आणि शैक्षणिक सुविधा ही सर्व कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच मार्गी लागली आहेत,” असे प्रतिपादन सविता बगाटे यांनी यावेळी कले . अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विकासाची ही गंगा अखंड सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले आणि पाबळ गणातील उमेदवार वंदना पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले.
निवडणुकीच्या मैदानात विकासाचा मुद्दा
प्रफुल्ल शिवले आणि वंदनाकाकी प्रकाश पवार यांच्या उमेदवारीला या अस्थी दर्शन सोहळ्यानंतर मोठी भावनिक किनार लाभली आहे. मतदारांनी केवळ राजकीय कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर विकासाचा वारसा पुढे नेणारे प्रतिनिधी म्हणून या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शोक सभेच्या शेवटी, उपस्थित नागरिकांनी शांतता राखून आदरांजली वाहिली. मात्र, या सभेने निवडणुकीच्या वातावरणात एक वेगळीच दिशा दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मोठी सहानुभूती निर्माण झाल्याचे चित्र पाबळमध्ये पाहायला मिळत आहे. विकासाची शिदोरी आणि दादांच्या आठवणींच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात सज्ज झाले.